Weather Update : राज्यात कुठे किती पाऊस, काय आहे परिस्थिती? दिवसभरातील सर्व अपडेट वाचा…

Weather Update : भारतात 2025 च्या मान्सूनने या वर्षी असामान्य वेग दाखवला आहे. साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करतो, परंतु यावेळी तो 8 दिवस आधी म्हणजे 24 मे रोजी आला आहे.
इतकेच नाही तर 35 वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्रात मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे. मान्सून आतापर्यंत केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, बंगालचा उपसागर, मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पोहोचला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीनुसार, पुढील काही तासांत केरळ, मुंबई, किनारी महाराष्ट्र, दक्षिण झारखंड, उत्तर उत्तर प्रदेश आणि मेघालयात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
असे असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी तसेच चाकरमान्यांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
मुंबई, रत्नागिरी यांच्यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यांत पाऊस झाला आहे. यात अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांतही पाऊस झाला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांत अगोदरच पाऊस झाला आहे.
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला.
बारामतीत 25 घरांची अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.
फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफचं एक पथक फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.
पावसामुळे भीमा नदी काठावरील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर नीरा, भीमा व माण नदीच्या कोप बंधाऱ्यावरील वाहतूक थांबवली आहे. नाशिकमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पावसानं सिन्नर तालुक्याला झोडपलं.
रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. मुंबईत 24 तासांत 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही.
सुरक्षिततेचा सल्ला….
भारतीय हवामान खात्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा आल्यास लोकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. किनारी भागात आणि किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विद्युत उपकरणांपासून अंतर ठेवा आणि मोकळ्या जागेत मोबाईल वापरू नका. असं देखील सांगण्यात आलं आहे.





