महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र अशा जवळपास सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर घाट भागात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
‘या’ जिल्ह्याना देण्यात आला रेड अलर्ट
आज रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.





