Weather Update : येत्या काही महिन्यांत भारतीयांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (Weather Update) शनिवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत देशातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहतील. विशेषतः पश्चिम राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब या राज्यांसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये कडाक्याचे ऊन पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते मे या काळात दक्षिण आणि पूर्व महाराष्ट्र, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक व तामिळनाडूच्या उत्तर भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक जाणवेल. मात्र, मार्च महिन्याचा विचार करता, देशाच्या अनेक भागांत कमाल तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत आणि हिमालयीन पट्ट्यात मात्र मार्चमध्येही तापमानाचा पारा चढाच राहू शकतो. मार्च महिन्यात देशभरात पावसाचे प्रमाण सरासरी इतके राहण्याचा अंदाज असल्याने उन्हाच्या तीव्रतेत काहीसा दिलासा मिळू शकतो, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, यंदाचा फेब्रुवारी महिना कोरडा गेला असून २००१ नंतरची सर्वात कमी पावसाची नोंद या महिन्यात झाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात देशात कुठेही शीतलहरीची नोंद झालेली नाही, जे हवामानातील बदलाचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.