Weather Update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ! 18, 19, 20, 21 नोव्हेंबरला अतिवृष्टीचा इशारा
Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र 16 नोव्हेंबरला चक्रीवादळात बदलण्याची शक्यता. आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि ओडिशाला अतिवृष्टीचा इशारा.

Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे 15 नोव्हेंबरला तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 16 नोव्हेंबरला या प्रणालीचे चक्रीवादळात, तर 17 नोव्हेंबरला तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण आणि पूर्व भारतातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळाचा वेग किती असणार?
IMD च्या अंदाजानुसार, 16 नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटरपर्यंत राहू शकतो. 17 नोव्हेंबरला तो ताशी 90 ते 100 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील दिवसांत वादळाची तीव्रता आणखी वाढू शकते.
कोणत्या राज्यांत मुसळधार पाऊस?
तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये 18 आणि 19 नोव्हेंबरला अतिवृष्टीचा इशारा आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 19 आणि 20 नोव्हेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टी, तर उत्तर किनारपट्टीवर अतिवृष्टीचा धोका आहे. ओडिशामध्ये 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशात धुक्याचा इशारा
उत्तर प्रदेशात 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये 16 नोव्हेंबरला आकाश मुख्यतः निरभ्र राहील. तापमान 14 ते 28 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह पश्चिम भारतात मोठ्या हवामान बदलाची शक्यता नाही.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
समुद्रातील वादळी वारे आणि उंच लाटांमुळे मच्छीमारांनी 15 नोव्हेंबरपर्यंत किनाऱ्यावर परतावे. तसेच बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात 17 ते 20 नोव्हेंबरपर्यंत विविध भागांत मासेमारी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचनांचे पालन करावे.





