रेशनिंग आणायला जाणाऱ्या महिलेवर काळाचा घाला

मंचर (प्रतिनिधी) – स्कुटीवरून रेशनिंग आणण्यासाठी जात असलेल्या विवाहित महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 12) घडली. सुजाता संतोष मेंगडे (वय 36, रा. मंचर) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती व सासर यांच्यापासून सुजाता या गेली काही वर्षे अलिप्त असून त्या मंचर येथे राहत होत्या.
मंचर येथील एका पतसंस्थेत दैनंदिन ठेवी गोळा करून त्या व त्यांच्या तीन मुलांचा खर्च भागवत होत्या. त्यांची मुलगी अक्षदा ही बी फार्मसी शिक्षण घेत असून तन्वी ही बारावीत मंचर येथे तर प्रणव हा आठवीमध्ये मंचर येथे शिक्षण घेत आहे. या मुलांना वडिलांचा आधारच नव्हता.
संचारबंदी लागू असल्यामुळे दैनंदिन ठेवीचे त्यांचे काम बंद होते. घरात असलेले गहू-तांदूळ संपून गेल्यामुळे जेवण कसे तयार करायचे? हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. कुटुंबाची भूक भागवण्यासाठी त्या शुक्रवारी स्कुटी घेऊन रेशनिंग आणण्यासाठी मेंगडेवाडीला जात होत्या. अवसरी बुद्रुक येथील चाहेंगे वस्तीवर त्यांच्या स्कुटीला अपघात झाला. जखमी अवस्थेत त्यांना मंचर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.





