“आम्ही तर महिलांना…” उर्फी जावेद प्रकरणाबाबत अजित पवार यांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात.गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सुरु असलेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. हा वाद थंडावले असं वाटत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणात उडी घेत ट्विट केले. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात उर्फी जावेद प्रकरणावरून वाद सुरु असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यम कर्मींनी अजित पवार यांना उर्फी प्रकरणाबाबत सवाल विचारला असता ते म्हणाले,”महिला महिलांमध्येच वाद सुरु आहे. या प्रकरणात आम्ही कोणी बोलतोय का ? आम्ही त्यात भाग घेतलाय का ? आम्ही तर महिलांना संधी देतोय,त्या संधीच सोन करायचं की राख करायची हे त्यांच्या हातात आहे. असं स्पष्ट मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलं.
उर्फीच्या फॅशनवर प्रश्नचिन्ह निर्माण करत चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावरच ताशेरे ओढले. महाराष्ट्र महिला आयोग महाराष्ट्राची कन्या तेजस्विनी पंडितला तिच्या पोस्टरवरून नोटीस पाठवू शकते. मात्र, भरस्त्यात लाईव्ह शो करणाऱ्या, नंगानाच करणाऱ्या मॉडेलला महिला आयोग नोटीस पाठवत नाही, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला. याप्रकारे उर्फी जावेदच्या मुद्द्यांवरून चित्रा वाघ यांनी थेट रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला होता.यानंतर चित्रा वाघ यांनी महिला आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण केल्याबद्दल नोटीस बजाविण्यात आली आहे.





