इंदापूर माजी तालुकाप्रमुख बोंद्रे यांची माहिती
रेडा -इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा युती धर्मानुसार भाजपचा नाही तर तो शिवसेनेचा आहे. त्यामुळे राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील जर शिवसेनेत प्रवेश करणार असतील, तर त्यांचे शिवसैनिक स्वागत करतील. इंदापूर विधानसभा विजयी करण्यासाठी पाटील यांच्यासाठी शिवसैनिक जीवाचे रान करतील, असे इंदापूर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विशाल बोंद्रे यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेश लवकरच करतील, असे वृत्त गावागावांत पसरल्या आहेत. याविषयी शिवसेनेचे नेते बोंद्रे हे इंदापूर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. बोंद्रे म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी इतर पक्षात न जाता शिवसेनेमध्ये प्रवेश करावा. तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील 22 गावाचा पाण्याचा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातूनच सुटू शकतो; त्यामुळे येथील आमदार हा देखील शिवसेनेच्या विचाराचा असणे गरजेचे आहे.
इंदापूर विधानसभेची जागा शिवसेनेची असल्यामुळे पाटील यांनी इतरत्र प्रवेश न करता शिवसेनेमध्ये प्रवेश करावा. कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष थापाड्यांचा असल्याने तालुक्यातील जनता कंटाळली आहे, त्यामुळे शिवसेनेसारख्या पक्षाकडे केवळ विकासात्मक अजेंडा असल्याने राज्यांमध्ये अनेक मातब्बर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत; त्यामुळे शिवसेनाच इंदापूर ग्रामीण भागाचा व शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढू शकते, असाही आशावाद बोंद्रे यांनी व्यक्त केला.