Pimpri : वेळ आल्यास आम्ही गोळ्या झेलू

हिंजवडी : आयटी पार्क उभारण्यासाठी भूमिहीन होऊन २८०० एकर जमीनीचे योगदान देऊनही माण गावासाठी सरकारने काय केले हे पहिले जाहीर करावं. त्याग करून आमच्या गावाचे साधे नाव ही आयटी उद्यानात कुठे येत नाही. ही आमची शोकांतिका आहे. तुम्ही अटक करण्याची भाषा करता. पण वेळ आल्यास प्रसंगी आम्ही गोळ्या झेलू, असा इशारा माण गावातील ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच अजित पवारांनी आमचे म्हणणे समजून घ्यावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
देश हिताचा विचार करून आम्ही कायम आमच्या जमिनी द्यायच्या आणि सरकारने तरीही स्थानिकांना डावलून धनदांडग्याना प्राधान्य द्यायचे. हे क्रूरकर्म सरकारने बंद करावे. अजितदादा तुम्ही आमचं पण म्हणणं ऐकून घ्या ओ. बळजबरीने आमच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केल्यास वेळप्रसंगी आम्ही छातीवर गोळ्या झेलू, प्रसंगी जीव देऊ. पण सरकारने दडपशाही करून आमच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यास 2006 च्या माण आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, असा आक्रमक पवित्रा माण ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला.
पर्यायी रस्त्यांना आम्ही सहकार्य करू. पण 2021 च्या प्रस्तावित विकास आराखड्यानुसार गावठाणात 24 मीटर तर गावाबाहेर 30 मीटर रुंदीचाच रस्ता करावा, या मागणीसाठी माण ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माण गावठाणातून जाणाऱ्या प्रस्तावित ३६ मीटर रस्त्याच्या विरोधात मंगळवारी (दि. ५) बोलाविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत माण ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
सरपंच अर्चना आढाव यांच्या अध्यक्षतेखाली माण ग्रामपंचायतच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात विशेष ग्रामसभा पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी मदन शेलार यांनी विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा करण्याचे आवाहन केले. यावेळी संतोष मोहिते, विजय राक्षे, सुरेश पारखी, मल्हारी बोडके,संगीत, किरण राक्षे, शिवाजी भिलारे यांनी परखडपणे आपली भूमिका मनोगतातून व्यक्त केली. संदीप साठे यांनी ग्रामसभेचे आभार मानले. यावेळी माण ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माण ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
आमच्या जमिनीवरती एमआयडीसी आरक्षणाचे शिक्के रद्द करा
आयटी फोरम व काही अधिकारी अजितदादांची करतात दिशाभूल
जमिनीवर शिक्के असल्याने कुठलं कर्जही मिळत नाही.
एमआयडीसीने अगोदरच रस्त्याचे नियोजन का केले नाही?
आयटी कंपन्यांसाठी कवडीमोल दराने जागा घेतल्या.
शेतक-यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात का घातल्या?
पीएमआरडीएची कारवाई म्हणजे जखम पायाला मलम डोक्याला
बाराशे एकरवर आयटीच्या चौथ्या टप्प्याचे आरक्षण
नोटीस न देता पीएमआरडीएकडून अवैध भूसंपादन
लाडक्या बहिनींचा संसार उध्वस्त करू नका
अजितदादा एकीकडे तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये लाडक्या बहिणींना देता. परंतु दुसरीकडे त्याच दीड हजार बहिणींच्या जमिनी रस्त्यांसाठी बळजबरीने घेऊन त्यांना बेघर करीत आहात. लाडक्या बहिणीचा संसार उध्वस्त करता, हे तुम्हाला पटतंय का ?
– संगीता इरलेकंपन्या व बिल्डरांनी ओढ्या नाल्यात सोडलेल्या घाण पाण्यामुळे रोगराई पसरली आहे. दूषित पाण्यामुळे आम्ही मरण यातना सहन करत आहोत. याकडे कुणी लक्ष देत नाही. आमच्यावर दडपशाही केली तर आम्ही वेळ आली तर जीव द्यायला तयार आहोत.
– दत्तात्रय पारखी (ग्रामस्थ)





