पुणे,{प्रभात वृतसेवा} – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम न केल्याने खासदार मुरलीधर मोहोळ यांना लोकसभा निवडणुकीत वडगावशेरी विधानसभा मतदार संघात अपेक्षीत लीड मिळाले नाही. त्यामुळे, ही जागा विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यास भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवाराला सहकार्य मिळणार नाही, अशा शब्दांत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट पंकजा मुंडे यांच्या समोर नाराजी व्यक्त केली. तसेच, पक्षाने जगदीश मुळीक यांना उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणी कार्यकर्त्यांनी केल्याने विधानसभेच्या तोंडावर भाजप विरोधात राष्ट्रवादी, असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीबाबतच्या तक्रारींचा पाढाच वाचला. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदिश मुळीक, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सरचिटणीस माजी नगरसेवक राहुल भंडारे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, नगरसेविका मुक्ता जगताप, नगरसेविका ऐश्वर्या जाधव आणि वडगाव शेरी तील पदाधिकारी उपस्थित होते. वडगाव शेरी मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार दिला. तरच, वडगाव शेरी मध्ये महायुतीचा आमदार होईल. राज्य शासनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या आमदार आणि कार्यकत्यांना बोलवत नाही. पालिकेचे बजेट राष्ट्रवादीचे आमदार वापरतात. भाजपच्या कामाचे श्रेय राष्ट्रवादी घेत आहे. यामुळे वडगाव शेरी मतदार संघात भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणीचे निवदेन कार्यकत्यांनी मुंडे यांना दिले. तसेच, निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार असल्यास भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे काम करणार नाहीत, असा इशाही दिला. कार्यकर्त्यांची केली बोळवण… भाजप पदाधिकाऱ्यांच्या भावना या बैठकीत पकंजा मुंडे यांनी जाणून घेतल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांची बोळवण केली. महायुती म्हणून आमची टीम सक्षमपणे काम करीत आहे. राज्यामध्ये महायुतीचे नेते दौरा करीत आहेत. आम्ही मतदार संघामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहोत. महायुती म्हणून आम्ही ताकदीने लढणार आहोत. महायुतीची सत्ता स्थापन करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार काम करावे. बैठकीस अनेकांची अनुपस्थिती… वडगाव शेरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सहा नगरसेवक आले नव्हते तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणारे माजी आमदार बापू पठारे हे ही उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी वेगळा निर्णय घेतला का, याची चर्चा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये रंगली होती. यावर मुंडे यांनी काही अडचणीमुळे नगरसेवक आणि इतर पदाधिकारी बैठकीला आले नसतील असे सांगून सारवासारव केली.