सांगवीतील चुकीचे आरक्षण होवू देणार नाही : आ. शंकर जगताप

पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड महापालिकेचेच्या वतीने नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित विकास आराखड्यातील काही आरक्षण हे गरज नसताना प्रशासनाकडून टाकण्यात आलेले आहे. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांना विचारात न घेता प्रशासनाकडून ही आरक्षणे टाकली आहेत. मनमानी पद्धतीने आरक्षण लादण्याचा आरोप चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी (दि. २७) जुनी सांगवी येथे आयोजित आरक्षण विरोधी जाहिर निषेध मेळाव्यात बोलताना केला.
सांगवी येथील काही जागेवर प्रस्तावित स्मशानभूमी आणि दफनभूमीचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे. नागरिकांनी आरक्षणाला बेकायदेशीर, एकतर्फी आणि मनमानी असल्याचे सांगत जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या आरक्षणाची कोणतीही मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली नसून याची आवश्यकता देखील नाही. त्या जागेचा उपयोग खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिक केंद्र, वाचनालय, कम्युनिटी हॉल अशा लोकोपयोगी कार्यांसाठी व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. जुन्या सांगवीतील आरक्षणे रद्द करून ती विकासासाठी खुली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मधूबन सोसायटी परिसरातील शाळेसाठी दहा जागांवर आरक्षणं प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये शासकीय शाळा, खासगी शाळा अस्तित्वात असून, काही जागांवर बांधकामही झाले आहे. मात्र, प्रस्तावित जागा रिकाम्या आहेत. सांगवीतील अनेक जागा शासकीय असून, महापालिकेकडे याचा नकाशा उपलब्ध आहे.
आरक्षण जागेचा उपयोग सार्वजनिक आणि उपयुक्त कार्यासाठी व्हावा, अशी आग्रही मागणी या मेळाव्यात करण्यात आली आहे. यावेळी माजी महापौर उषा ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, गणेश ढोरे, प्रमोद ठाकर,जवाहर ढोरे, हिरेन सोनवणे, कुमार ढोरे, कुणाल साठे, सोनाली शिंपी, दर्शना कुंभारकर, संतोष ढोरे, वैभव ढोरे, कृष्णा भंडलकर, युवराज ढोरे, लक्ष्मण प्रधान आदी सांगवीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





