‘आम्ही त्यांचे सर्वोच्च बलिदान कधीच विसरणार नाही’; पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना पंतप्रधानांची श्रद्धांजली

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेचा आज स्मृती दिन होता.
मोदी यांनी या संबंधात जारी केलेल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, आम्ही पुलवामामध्ये या दिवशी गमावलेल्या आमच्या शूर वीरांचे स्मरण करत आहोत. आम्ही त्यांचे सर्वोच्च बलिदान कधीच विसरणार नाही. त्यांचे धैर्य आम्हाला एक मजबूत आणि विकसित भारत तयार करण्यासाठी प्रेरित करते,” असे त्यांनी म्हटले आहे.
तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये या दिवशी, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. स्फोटकांनी भरलेली कार या जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर आदळून हे हत्याकांड घडवण्यात आले होते. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदने केला असल्याचे सांगितले जात आहे. या संघटनेचे नेतृत्व बहावलपूरस्थित मसूद अझहर करत आहे.





