“महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणार”; हडपसरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

* मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
* हडपसर भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी गाडीतळ येथे मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले
हडपसर: महाराष्ट्राच्या जनतेच्या आशिर्वादाने मला मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. माझ्यासह माझ्या पन्नास आमदारांनी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाची भूमिका स्विकारली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची शिकवण आम्ही पुढे घेऊन जात आहे. म्हणूनच या राज्याला सुजलाम-सुफलाम करण्याचा, सर्वसामान्यांच्या जीवनात चांंगले दिवस आणून महाराष्ट्राला न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच शहरात आले होते. हडपसर येथे त्यांचा माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्यावतीने उद्योजक बाळासाहेब भानगिरे यांच्या हस्ते विठ्ठलमूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी अमरनाथ यात्रेतील मृत भाविकांना श्रध्दांजली वाहन्यात आली.
माजी मंत्री विजय शिवतरे,शिवसेनेचे अजय भोसले, शशिकला वाघमारे, संतोष भानगिरे, सिध्दार्थ भानगिरे, विनोद शिंदे,उल्हास तुपे आदीसह माजी नगरसेवक भानगिरे यांचे समर्थक व मित्र परिवार खास करून महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “व्यस्त वेळेतही आपल्या प्रेमामुळे मी भेटायला आलो आहे. आपल्याला भेटण्यासाठी मी परत येणार आहे. आज मी पंतप्रधानांसह केंद्रातील विविध व्यक्तींना भेटलो. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रातून चांगले सहकार्य करण्याचे त्यांनी या भेटीत सांगितले आहे.’
प्रमोद भानगिरे व्यासपीठावर न दिसल्याने उपस्थितांमध्ये काही काळ चर्चा रंगली होती. मात्र, मुख्यमंत्री मार्गस्थ झाल्यावर थोड्या वेळाने भानगिरे कार्यक्रमस्थळी आले. आपण एका रूग्णवाहिकेला रस्ता दिल्यामुळे वाहतूककोंडीत अडकून पडलो होतो असल्याचा खुलासा केला. आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भानगिरे हे शिंदे गट समर्थक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हडपसर मतदार संघातही आता शिवसेना विरूद्ध शिंदे गट असे चित्र पाहवयास मिळणार आहे. दरम्यान, हा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या महापूजेसाठी पंढरपूरकडे रवाना झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माझे गुरू
मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिंदे साहेबांनी कायम मला मदत केली आहे. प्रभागातील ,नव्याने समाविष्ट गावातील समस्या येथील विकासासाठी लागणारा निधी, हडपसरमधील रखडलेल्या पाणी टाकी व पाणी जलवाहिनी कामासाठी त्यांनी मोठी मदत केली आहे.त्यांना मी गुरू मानतो. त्यामुळे मी त्यांचा समर्थक म्हणून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला याचे मला आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांनाच याचा मोठा आनंद झाला आहे.
प्रमोद नाना भानगिरे, माजी नगरसेवक, शिवसेना-हडपसर





