भारताला नक्षलवादापासून मुक्त करणार, अमित शाहांनी थेट तारीखच सांगितली; जम्मू-काश्मीरबाबत म्हणाले…

Amit Shah on Naxalism | देशाला 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. राज्यसभेत बोलताना त्यांनी गृहमंत्रालयाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी देश नक्षलवाद मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवल्यानंतरच्या परिस्थितीबाबतही ते बोलले.
कलम 370 हटवून मोदी सरकारने संविधान निर्मात्यांच्या ‘एक संविधान, एक ध्वज’ या स्वप्नाची पूर्तता केली. आता काश्मीरमध्ये सायंकाळीही थिएटर्स खुली राहतात, तेथे G20 ची बैठक झाली आणि मोहर्रमच्या मिरवणुकीलाही परवानगी देण्यात आली, असे राज्यसभेत बोलताना अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, ईशान्य भारतातील उग्रवाद आणि डाव्या विचारसरणीचा नक्षलवाद हे देशाच्या विकासाला अडथळा आणणाऱ्या तीन मोठ्या समस्या होत्या. या समस्यांमुळे 92,000 लोकांना प्राण गमवावे लागले. मोदी सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 70% घट झाली असून, दहशतवादी घटनाही झपाट्याने कमी झाल्या आहेत.
‘नक्सलमुक्त भारत अभियान’ की दिशा में आज हमारे जवानों ने एक और बड़ी सफलता हासिल की है। छत्तीसगढ़ के बीजापुर और कांकेर में हमारे सुरक्षा बलों के 2 अलग-अलग ऑपरेशन्स में 22 नक्सली मारे गए।
मोदी सरकार नक्सलियों के विरुद्ध रुथलेस अप्रोच से आगे बढ़ रही है और समर्पण से लेकर समावेशन की…
— Amit Shah (@AmitShah) March 20, 2025
2019 ते 2024 या काळात जम्मू-काश्मीरमध्ये 40,000 सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. 1.1 लाख कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, 31 मार्च 2026 पर्यंत डाव्या विचारसरणीचा नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल, असा दावा देखील त्यांनी केला.
31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल. नक्षलवाद ही राजकीय समस्या नाही. याचा नायनाट करणे आवश्यक आहे आणि भारत सरकार ते एका वर्षाच्या आत करून दाखवेल. सरकार नक्षलग्रस्त भागात विकास करत आहे, जेणेकरून तेथील लोक मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील, असे अमित शाह राज्यसभेत बोलताना म्हणाले.





