“आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार”; भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडून भूमिका स्पष्ट

Prasad Lad On Amit Thackeray | माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर शिवसेना शिंदे गटकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे.
अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचबरोबर भाजपाचीही त्यांना साथ मिळत आहे. त्यामुळे सदा सरवणकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र सरवणकर निवडणुक लढवण्यावर ठाम आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (२ नोव्हेंबर) सदा सरवणकर यांना त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. यावर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी माहीम विधानसभेबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड काय म्हणाले ?
आमदार लाड म्हणाले, “अमित ठाकरे हा आमच्या कुटुंबातील मुलगा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो आणि या निवडणुकीत आम्ही राज ठाकरे यांना मदत करावी यावर ठाम आहोत. सदा सरवणकर हे शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
पुढे ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढून त्यांना विधान परिषदेवर संधी द्यायला हवी. यासह त्यांच्याकडे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्यात आलं आहे. तसेच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटतंय की सरवणकर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमची भूमिका मान्य करतील. भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही या निवडणुकीत अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहोत.” Prasad Lad On Amit Thackeray |
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. Prasad Lad On Amit Thackeray |




