PM मोदी, CM फडणवीसांना ‘उडवून देऊ’; महाराष्ट्रातील खासदाराची थेट धमकी

मुंबई : महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘उडवून देण्याची’ धमकी दिली आहे. परतीच्या अतिवृष्टीमुळे धान पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या संतापातून ही धमकी आली असून, ‘शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, तर PM-CM ला उडवतील’ असे ते म्हणाले. नेत्यांच्या ‘कापा-कापी’ भाषेमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राचा वारसा धोक्यात आला का, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
बुलढाण्यातील पातुर्डा गावात झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत ‘आमदाराला कापून टाका, त्यांच्या घरासमोर कपडे काढून बसा’ अशी भाषा केली गेली. आता खासदार पडोळे यांनी हे टोक गाठले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतातील धानाला कोंब फुटले असून, पीक विम्यापोटी अवघे १८ रुपये मिळणे ही शोकांतिका आहे. ‘सरकारने धोरणे बदलली नाहीत तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, तर PM आणि CM ला उडवून देतील,’ अशी थेट धमकी पडोळे यांनी दिली.
भंडारा-गोंदिया भागात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस कोसळला. धान पिक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. ‘देशाचे PM आणि राज्याचे CM यांनी तातडीने लक्ष द्यावे,’ अशी मागणी करताना खासदारांनी सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्वरित उपाययोजना हवी, अन्यथा परिणाम भयंकर होतील, असा इशारा त्यांनी दिला.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर त्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले. ‘३० जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाईल. कर्जमाफीचे निकष, उपाययोजना ठरवल्या जातील,’ असे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.





