नागपूर : दिवाळीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात भाजपाच्या विभागीय कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. नागपुरच्या कार्यालयात त्यांनी अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना भेटी दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. तसेच यावेळी अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोरी केलेले लोक आमचेचे आहेत, त्यामुळे त्यांची समजूत काढण्यात आम्हाला नक्की यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला पक्षातील अनेकांना लढण्याची इच्छा होती, मात्र त्यांना संधी न मिळाल्यामुळे ते नाराज आहे. त्यामुळे अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पाहायला मिळाले आहेत. महायुतीमध्ये देखील काही नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बंडखोरांना शांत करण्यात यशस्वी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे. तसेच त्यांची समजून काढणे हे आमचे काम सुरू आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अनेकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय देखील जाहीर केला आहे. ही बंडखोरी महाविकास आघाडीसह महायुतीत देखील पाहायला मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा निर्णय अनेक नेत्यांनी घेतला आहे. दरम्यान, 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळे कोणते उमेदवार निवडणूक लढवणार आणि कोणते उमेदवार माघार घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.