नवी दिल्ली – केंद्रात डॉ. मनमोहन सिंग आणि दिल्लीत शीला दीक्षित यांचे सरकार असताना राजधानी दिल्लीत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने चांगलाच जोर धरला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाने देशात आणि दिल्लीत सत्ताबदल घडवून आणला. त्यातूनच पुढे आम आदमी या पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा उदय झाला. नंतरच्या काळात त्या आंदोलनातील केजरीवाल यांच्या समवेत असलेले एक एक शिलेदार गळाले किंवा ते केजरीवालांनी घालवले असे आरोपही झाले. त्यापैकीच एक प्रख्यात कवी कुमार विश्वास. सत्येंद्र जैन प्रकरणावरून याच विश्वास यांनी पुन्हा एकदा केजरीवालांवर निशाणा साधला आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री असलेल्या जैन यांना ईडीने अटक केली आहे. याच जैन यांच्याकडून पक्षाच्या बैठकीत आपण सगळ्यांसमोर त्याचवेळी खुलासा मागितला होता, असा दावा विश्वास यांनी केला आहे. मात्र जैन यांचे सगळे ठिकठाक आहे असे आपल्याला त्यावेळी सांगण्यात आले होते, असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर आपल्या राजकीय काव्यात्मक भाष्याकरता प्रसिध्द असलेल्या कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्या अनुशंगो पुढील ओळी लिहील्या आहेत. उसको (केजरीवाल) हमने नजरियां समझा था लेकीस उसने हमे सिर्फ एक जरिया समझा असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कुमार यांच्या या ट्वीप्पणीनंतर काही जणांनी कुमार यांनी आंदोलनाच्या वेळी केजरीवाल यांची प्रशंसा केलेली जी भली मोठी पोस्ट टाकली होती ती पुन्हा व्हायरल केली आहे.