‘सुसंस्कृत व सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करावे’ – उदय सामंत

पुणे – विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करुन त्या क्षेत्राचा नावलाैकिक वाढविला पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जाेपासून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करावे, असे मत उद्याेग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आयाेजित नवव्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते.
यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलगुरू डाॅ. राकेश कुमार जैन उपस्थित हाेते. यावेळी उदय सामंत यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मानद डाॅक्टरेट (डी. लिट) देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये प्रा. डॉ. निशाकांत ओझा, डॉ. रचना बुक्सानी-मिरपुरी, महाराज कुमार डॉ. लक्ष्यराज सिंग, अमित धमानी, नवाब शाजी उल मुल्क या मान्वरांना डी. लिट प्रदान करण्यात आली. त्याचबराेबर अभियांत्रिकी, डिझाइन, चित्रपट, माध्यम, कायदा, लिबरल आर्ट्स, हॉटेल व्यवस्थापन आणि वास्तुकला अशा विविध शाखांमधील एक हजार हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
परदेशात राहणाऱ्यांना मराठी शिकविण्यासाठी अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम तयार केला जाणर आहे. शिक्षण संस्था चालकांची सकारात्मक मानसिकता असेल, तर सुसंस्कृत, सुदृढ महाराष्ट्र घडण्यासाठी वेळ लागणार नाही, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.
नव्या तंत्रज्ञानाची आव्हाने स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहायला हवे. यासाठी इनोव्हेटिव्ह विचार करावा लागेल. विविध प्रकारची कौशल्ये मिळवावी लागतील, असे डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी स्पष्ट केले.
मानद डाॅक्टरेट मिळाल्याने उदय सामंत भावुक
डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मानद डाॅक्टरेट प्रदान झाल्यावर मंत्री उदय सामंत भावुक झाले. मी डाॅक्टर व्हावे अशी माझ्या आई – वडीलांची इच्छा हाेती. आजपासून माझ्याही नावासमाेर डाॅ. लागणार आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची नाेंद घेऊन मानद डाॅक्टरेट प्रदान करून सन्मान केल्याचा आनंदही सामंत यांनी व्यक्त केला.





