Donald Trump : “सात युद्धे थांबवल्यामुळे आपल्याला नोबेल पुरस्कार मिळायला हवा” – डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump : जगभरातील सात युद्धे थांबवल्यामुळे आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा, अशी अपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावाही केला आहे.
मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू झालेला संघर्ष आपल्या मध्यस्थीमुळे थांबल्याचा दावा ट्रम्प यांनी १० मे पासून आतापर्यंत ४० वेळा केला आहे. मात्र हे युद्ध थांबवण्यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता, असे बारताने वारंवार स्पष्ट केले आहे.
जागतिक मंचावर आम्ही पुन्हा असे काम केले आहे, त्यामुळे मिळालेला आदर यापुर्वी कधीही मिळाला नव्हता. आम्ही शांतता करार लागू करत आहोत. आम्ही युद्ध थांबवत आहोत. त्याच प्रमाणे आम्ही भारत आणि पाकिस्तान, थायलंड आणि कंबोडियामधील युद्ध देखील थांबवले आहे, असे अमेरिकन कॉर्नरस्टोन इन्स्टिट्युट फौंडेशनच्या भोजन समारंभातबोलताना ट्रम्प म्हणाले.
भारत, पाकिस्तान, थायलंड, कंबोडिया, आर्मेनिया, अझरबैजान, कोसोवो आणि सर्बिया, इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथिओपिया, रवांडा आणि काँगो ही सर्व युद्धे आम्ही तांबवली आहेत. यातील ६० टक्के युद्धे व्यापारमुळे थांबली आहेत.
भारत आणिपाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रसंपन्न देश आहेत. त्यांनी आपापसातील युद्ध थांबवले नाही, तर व्यापार करणार नाही, असे आम्ही सांगितले आणि युद्ध थांबले. त्याच प्रमाण जर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थाबवता आले, तर आपल्याला नोबेल पुरस्कार मिळायला हवा, असे ते म्हणाले.





