नवी दिल्ली – नव्या वर्षाची सुरूवात झाली आहे. देशातील नागरिक परस्परांना शुभेच्छा देत आहेत. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनीही देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र त्याचवेळी हिंसाचाराची झळ बसलेल्या युध्दक्षेत्र गाझामधील नागरिकांचेही स्मरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपण परस्परांना शुभेच्छा देत आहोत. आपल्या आयुष्यात प्रेम, शांतता, स्थैर्य, आनंद आणि सगळे चांगले व्हावे अशा अपेक्षा आपण व्यक्त करत आहोत. मात्र त्याचवेळी आपळे जिवन, सन्मान आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अमानवीय आणि अन्यायपूर्ण हल्ल्याचा सामना करत असलेल्या गाझामधील आपल्या भावा बहिणींचेही आपण स्मरण करावे असे प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या म्हणाल्या की एकीकडे आपली मुले नव्या वर्षाचे आनंदात स्वागत करत आहेत तर दुसरीकडे गाझामध्ये इस्त्रायल- हमास संघर्षात अनेक लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केली जाते आहे. जगातील अनेक नेते हे सगळे गुपचूप पाहत आहेत. सत्तेच्या लालसेपोटी हे सगळे होते आहे. गाझातील हा हिंसाचार थांबवावा अशी मागणी जगातील लाखो लोक करत आहेत. हेच शूर मनाचे लाखो लोक आपल्या उद्याच्या भविष्याच्या आशेचा एक नवा किरण घेऊन आले आहेत. आपण त्यांच्यातलेच एक होऊया. इस्त्रायल- हमास संघर्ष सुरू झाल्यापासून प्रियंका यांनी सातत्याने त्याच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. हे युध्द तात्काळ थांबवले जाण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी आता एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात भारतात नववर्षाच्या स्वागतासाठी आतषबाजी होत असताना गाझामध्ये त्याचवेळी बॉम्बहल्ले होत असल्याचे दिसून येते आहे.