“पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे खूप पर्याय पण..” उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

मुंबई – गेल्या 9 वर्षांत रक्षाबंधन झाले नव्हते का? त्यावेळी केंद्र सरकारने गॅसची दरवाढ का कमी केली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला लगावला. उद्या मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.यावेळी इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत देखील त्यांनी भाष्य केले.विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात,नाना पटोले असे महत्वाचे नेते देखील उपस्थित होते.
केंद्र सरकार सध्या गॅसवरती आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल तेव्हा केंद्र सरकार गॅस सुद्धा मोफत देईल असा टोला देखील ठाकरेंनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारला गॅस दर कपातीवरून लगावला.यावेळी ठाकरेंना इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाबाबत देखील सवाल विचारण्यात आला.
इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाबाबतचा सवाल विचारल्यावर ठाकरे म्हणाले,”पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. पण भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या दहा वर्षांत त्यांनी काय केलं? सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. आपण कर्नाटकात पाहिलं त्यांना कोणतंच यश मिळालं नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक
‘इंडिया आघाडी’ची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील सर्वच व्हीव्हीआयपी नेते हळूहळू मुंबईत दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या सुरक्षेला मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. मुंबईच्या सांताक्रुजमधल्या ग्रॅंट हयात हॉटेलच्या जवळपास त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे. नेत्यांच्या व्यवस्थेसाठी हॉटेलमधील 280 खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत.




