पाटणा – २००५ पूर्वी अशी स्थिती होती की हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सतत संघर्ष सुरू असायचा. भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाचे सरकार आल्यावर आम्ही दोन्ही समुदायांतील मतभेद आणि मनभेदही संपुष्टात आणले. आता कुठे हिंदू आणि मुस्लिम अशी भांडणे होत नाही. भाजप – संयुक्त जनता दलाच्या काळातच मदरशांना सरकारी मान्यता देण्यात आली असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी केले. विरोधी पक्ष भाजपचे नाव घेऊन मुस्लिमांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही सर्व धर्मांच्या लोकांसाठी काम करतो असे त्यांनी वाल्मिकी नगर येथील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सुनील कुमार यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभेत बोलताना सांगितले. ते म्हणाले की बिहार सरकारने जे काम केले आहे ते विसरू नका. भारतीय जनता पार्टीशी माझे संबंध १९९५ पासून आहेत. मध्ये दोन वेळा इकडे तिकडे झाले. मात्र राष्ट्रीय जनता दल गडबड करत होता. त्यामुळे त्यांना हटवण्यात आले. आता कुठेच न जाण्याचा आम्ही संकल्प केला आहे. आम्ही एकत्र पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद करून ते म्हणाले की गरिबीमुळे मुली पाचवीच्या पुढचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी सायकल आणि पोषाख योजना सुरू केली. मुली आता शिक्षण घेत आहेत. आरोग्य व्यवस्थेची वाईट स्थिती होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात एक किंवा दोन रूग्ण यायचे. आम्ही आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केली. आता महिन्याला ११ हजारच्या आसपास लोक तपासणीसाठी येतात. २००५ ते २०२० या काळात ८लाख जणांना नोकरी दिली. आता ती संख्या १० लाखापर्यंत न्यायची आहे. प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवली, शौचालय दिले आणि नळाने पाणी पोहोचवले. २००६ मध्ये पंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यामुळे अनेक महिला आज समाजाची सेवा करत आहेत. २००९ मध्ये नगरपालिकांमध्येही ५० टक्के आरक्षणाद्वारे महिलांसाठी संधीची दारे खुली केली. महिलाच्या प्रगतीसाठी जागतिक बँकेकडून आम्ही स्वमदत गटांची स्थापना केली. महिलांना या गटांशी जोडून घेत त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम केले असे नितीश यांनी सांगितले.