आम्ही युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणू शकतो – एअर मार्शल संदीपसिंह
Updated On:

नवी दिल्ली – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी भारतीय हवाई दल रोज चार विमाने तिकडे पाठवून त्यातून किमान दोनशे नागरीकांना परत आणू शकते असे हवाई दलाचे उपाध्यक्ष एअर मार्शल संदीप सिंग यांनी म्हटले आहे.
आज येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की आज सकाळपासून हवाईदलाची तीन विमाने तिकडे रवाना करण्यात आली आहेत. आम्ही या मोहीमेत तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणू शकतो असे ते म्हणाले. ते म्हणाले की या नागरीकांच्या मदतीसाठी विमानांमधून मदत सामग्रीही पाठवली जाईल.
परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयाने हे ऑपरेशन सुरू आहे असे ते म्हणाले. अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भारतीय वायुसेनेवर फारसा परिणाम होणार नाही, असेही हवाई दलाच्या उपप्रमुखांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.





