“आम्ही दिल्लीतील जनतेला आश्वासन देतो की सरकार पडणार नाही” – आप

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीकडून आम आदमी पार्टीचे दिल्लीतील आमदार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काल आपने केला होता. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला त्यांच्या 62 आमदारांपैकी 53 आमदार उपस्थित होते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आल्याचा दावा एका दिल्लीतील माध्यमाने केला आहे.
त्यांनी सांगितले की सकाळी 11 वाजता बैठक बोलावण्यात आली होती व ती काही मिनीटांतच संपली. बैठकीच्या अगोदर सर्व आमदारांशी फोनवर संपर्क साधण्यात आला होता, असे पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र त्यातील किमान 12 आमदारांनी फोनवर बोलणे होऊ शकले नव्हते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवाससस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, काही आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. कदाचित ते वाहतूक कोंडीत सापडले असतील. मात्र सगळे आमदार बैठकीला हजर राहतील आणि आपचे सरकार पडणार नाही असे आश्वासन आम्ही दिल्लीतील जनतेला देऊ इच्छीतो. दरम्यान, दिल्लीकरांची सहानूभुती मिळवण्याचा हा आणखी एक प्रकार असून आम्ही त्यांचे आमदार फोडण्याचा प्रश्नच येत नाही असे भाजपने म्हटले आहे.





