‘आम्ही तुफानातले दिवे’! निवडणूक जाहीर होण्याआधीच सोशल मीडियावर इच्छुकांची रणधुमाळी

प्रभात वृत्तसेवा
बेलसर – नुकत्याच महाराष्ट्रातील कार्यकाल संपलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. तर एका बाजूला मतदार याद्या शेवटच्या टप्प्यात असून कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. आरक्षणे जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावर रील्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आणि युट्यूबवर धुमाकूळ दिसत आहे.
सोशल मीडिया हे अलीकडील काळात अत्यंत प्रभावी आणि जलद माध्यम झाले आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कमी कालावधी आणि कमी कष्ट लागणारे हे माध्यम असल्याने इच्छुक उमेदवार मतदारांच्या मनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य करू पाहत आहेत.बायोग्राफी, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट आणि केलेल्या कामांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून आपली इच्छा व्यक्त करीत आहेत. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवून एक वेगळा ठसा पक्ष आणि पक्षश्रेष्ठींवर पाडण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियावर रिल्स, पोस्टर, स्टेटस, पोस्टच्या माध्यमातून आता इच्छुक लढण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.
आता सोशल प्लॅटफॉर्मला पसंती..
मागील सर्व निवडणुकांमध्ये प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचून आपली विकासकामे, कर्तृत्व आणि ओळख पोहोचविण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत होती. वचननामे, पँपलेट्स, स्टिकर याच्या पलीकडे जाऊन आला फक्त एका क्लिकवर हजारो मतदारांपर्यंत पोहोचता येत आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता सोशल प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. इच्छुकांना संधी मिळण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आणि पक्षश्रेंठींकडे उमेदवारी मिळण्यासाठी वर्णी लावण्यासाठी याचा किती फायदा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इच्छुकांची संख्या पाहता ज्याचे फॉलोअर्स जास्त ज्याचे व्हीवर्स जास्त तो प्रभावशाही ठरणार आहे.
इच्छुक ठरले तुफानातले दिवे..
आमची तळमळ विकासाची, वादळवाऱ्याने मावळणारे आम्ही नव्हे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, एक संधी नव्या पर्वाला- एक संधी नव्या नेतृत्वाला, सेवा आणि कर्तव्य हाच माझा धर्म, साधी राहणी उच्च विचार आणि सतत संपर्कात, आता थांबायचं नाय, Mission २०२५, लवकरचं येतोय आपला आशिर्वाद घ्यायला, बदल हवा आहे चेहरा नवा आहे अशा आशयाचे पोस्टर आणि रिल्स व्हायरल केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक देखील सोशल मीडियावर डिजिटल पद्धतीने लढवली जाणारी निवडणूक ठरेल, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.





