‘इंडिया’तून बाहेर पडण्यासाठी आप स्थिती तयार करतोय ! कॉंग्रेस नेत्याच्या दाव्याने विरोधकांची चिंता वाढली

नवी दिल्ली -कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते संदीप दीक्षित यांनी पुन्हा आपवर निशाणा साधला. इंडिया या विरोधकांच्या आघाडीतून बाहेर पडण्याच्या उद्देशातून आप स्थिती तयार करतोय, असा दावा त्यांनी केला.
बिहारमधील पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आपने सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर दीक्षित यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली. इंडियामधून आपचे बाहेर पडणे निश्चित असल्याचे वाटते. मी नेहमीच तसे म्हणत आलो आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही संसदेत बोलताना विरोधकांच्या आघाडीतून आप पळ काढेल असे म्हटले होते. तसे झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे दीक्षित म्हणाले. त्यावर आपकडून उपहासात्मक प्रतिक्रिया देण्यात आली. दीक्षित यांच्यासारख्या महान नेत्याच्या वक्तव्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांनी याआधीही विविध मुद्द्यांवरून आमच्या विषयी टीकाटिप्पणी केली आहे, असे आपचे खासदार संजय सिंह यांनी म्हटले.
बिहारमध्ये 2020 या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. पुढील निवडणूक वेळापत्रकानुसार 2025 वर्षाच्या अखेरीस होणार असल्याने अजून बराच अवधी आहे. त्या राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. सत्तारूढ महाआघाडीत जेडीयू, राजद आणि कॉंग्रेस या पक्षांचा समावेश आहे. ते सर्वच पक्ष आप सहभागी झालेल्या इंडियाचे घटक आहेत. त्यामुळे बिहारमध्ये लढण्याच्या आपच्या इराद्याने राजकीय वादाची ठिणगी पडली आहे.





