राज्यात कॉंग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवरून आम्ही नाराज-थोरात

खातेवाटपावरून कॉंग्रेसमध्ये नाराजी:मुख्यमंत्र्यांकडे फेरविचाराची मागणी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आता नाराजी नाट्य सुरू झाल्याचे दिसत आहे. राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे त्यात कॉंग्रेसला समाधानकारक खाते न मिळाल्याने पक्षातील नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉंग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवरून आम्ही नाराज आहोत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला दोन ते तीन महत्त्वाची खाती देण्याचा नक्की विचार करतील, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण नक्की कोणती महत्त्वाची खाती हे उघडपणे सांगण्यास त्यांनी नकार दिला. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी, डिसेंबर रोजी होतो आहे. त्यापूर्वीच आघाडीतील एका पक्षाने थेट नाराजी व्यक्त केल्याने उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते.
कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाला ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या ग्रामविकास, सहकार किंवा कृषी यापैकी एक खाते तर गृहनिर्माण आणि उद्योग या खात्यांपैकी एक खाते हवे आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला अधिकची खाती मिळाली तर आनंदच होईल. आमच्याकडे खूप नेते आहेत. त्यामुळेच आम्हाला मंत्रिमंडळातील जास्त खाती हवी आहेत. अर्थात हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसला आधी उपमुख्यमंत्रीपद हवे होते. पण नंतर वाटाघाटीमध्ये कॉंग्रेसला विधानसभेतील अध्यक्षपद देण्यात आले. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, कॉंग्रेसने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. परंतु, या चर्चेला कॉंग्रेसकडूनच पुर्णविराम देण्यात आला आहे.





