Wayanad landslide : वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या 231वर

वायनाड – केरळमधील वायनाडला ३० जुलैला विनाशकारी भूस्खलनाचा तडाखा बसला. त्यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. आणखी काही मृतदेह हाती आल्याने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३१ इतकी झाली आहे.
वायनाडमधील भूस्खलनानंतर सुमारे १३० जण बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी हाती घेण्यात आलेली मोहीम अजूनही सुरू आहे. त्यामध्ये एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल, वन विभागाची पथके सहभागी झाली आहेत. भूस्खलनाने अनेक घरे उद्धवस्त केली.
त्यामुळे विस्थापित झालेल्यांना मदत छावण्यांमध्ये आसरा देण्यात आला आहे. त्यांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनापुढे उभे आहे. भूस्खलनाने होत्याचे नव्हते केल्याने अनेकांनी घरांमधील सर्व सामग्री गमावली. त्यामध्ये अत्यावश्यक कागदपत्रांचाही समावेश आहे. त्यामुळे भूस्खलनग्रस्तांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ८७२ जणांना १ हजार १६२ कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.
संबंधित कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्रं, वाहन परवाना आदींचा समावेश आहे. भूस्खलनग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही केंद्र सरकारने केरळला दिली आहे.



