पुणे जिल्हा | शिक्रापुरात रणरणत्या उन्हात श्वानांना पाणी पुरवठा

शिक्रापूर, {शेरखान शेख} – सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना सर्वत्र भटक्या श्वानांसह पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना शिक्रापूर येथील पुणे नगर महामार्गावर डॉ. ज्योती खडे यांनी सत्तर कुंड्या बसवून श्वानांसह पशु पक्षांच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
शिक्रापूर येथील पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे या भागात मोठ्या प्रमाणात फिरणारे श्वान सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना प्रत्येक श्वान पाण्याच्या शोधात फिरत असताना काही श्वानांचे तोंड देखील पाण्याच्या शोधात बरणीत अडकल्याचे समोर आल्याने परिसरात श्वानांसह पशु पक्षांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय डॉ. खडे यांनी घेतला.
डॉ. पेट फोर्सचे व्यवस्थापक विनोद साळवी, सुनील इक्का, विकास टोप्पो, अनुराग इक्का यांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी असे तब्बल सत्तरहून अधिक कुंड्या बसवल्या आहेत, दररोज या ठिकाणी पाहणी करत परिसरातील नागरिकांना त्या कुंड्यांमध्ये पाणी टाकण्याचे आवाहन डॉ. ज्योती खडे करीत आहेत. मात्र, त्यांच्या उपक्रमामुळे शेकडो श्वानांसह पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था झालेली असल्याने डॉ. खडे यांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
नागरिकांनी उपक्रमात पुढाकार घ्यावा
डॉ. ज्योती खडे म्हणाले की, सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतो, तर श्वानांना भटकंती करावी लागत असल्याने वेगवेगळ्या दुर्घटना घडत असल्याने आम्ही हा उपक्रम राबवला असून नागरिकांनी देखील यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.





