satara | कास योजनेचा पाणीपुरवठा राहणार दोन दिवस बंद

सातारा, ( प्रतिनिधी )- कास पाणीपुरवठा योजनेच्या वाहिनीस गळती लागल्याने सोमवार आणि मंगळवारी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पत्रकाद्वारे दिली.
कास वाहिनीस गळती लागली असून, ती थांबविण्यासाठीच्या उपाययोजना पालिकेचा पाणीपुरवठा विभाग करत आहे. या कामादरम्यान अडचणी येत असल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
सोमवारी (दि. १३) कास योजनेतून सायंकाळच्या सत्रात पाणीपुरवठा होणाऱ्या पोळवस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भाग, बालाजीनगर, कांबळेवस्ती, जांभळेवाडा या परिसरातील तसेच कात्रेवाडा टाकीच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मंगळवारी (दि. १४) कास योजनेच्या माध्यमातून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकीच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात वितरित होणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करत पालिकेस कार्य करण्याचे आवाहनही बापट यांनी केले आहे.





