पुणे | पुणे शहरासाठी पाणीसाठा राखीव

पुणे, प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा खडकवासला प्रकल्पात राखीव ठेवला आहे. तसेच ग्रामीण भागातील दुष्काळी भागात पाण्याचे टॅंकर सुरु करण्यात आले आहेत. पुणे शहरात पाणी काटकसरीने वापरले तर पाण्याची बचत होऊन ते पाणी ग्रामीण भागाला देणे शक्य होईल,
असे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी सांगितले. दरम्यान पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरु नये, पाण्याचा वापर काटकसरीने वापरण्याच्या सूचना दोन्ही महापालिका आयुक्तांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
एका बाजुला लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरु असताना दुसऱ्या बाजुला पाणीटंचाईच्या परिस्थितीवरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी नुकताच जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच बारामती, इंदापूर या तालुक्यांचा नुकताच दौरा सुद्धा केला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले की, बांधकामांसाठी वापरण्यात येणारे पिण्याचे पाणी थांबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच, एक महिन्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
यामध्ये पिण्यासाठी पाण्याचे नियोजन, चारा छावणीबाबतचे नियोजन आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील काही दुष्काळी गावांमध्ये चारा छावणी सुरु करावी लागू शकते, यासाठी गावात पाहणी करून सुका आणि ओला चार किती आहे, याची माहिती घेण्यात येत आहे.





