पुणे जिल्हा | पाणी अद्याप जागेवरच; श्रेयवादासाठी रस्सीखेच सुरू

लोणी देवकर, (वार्ताहर)- सध्या राज्यासह इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना मात्र अजून न सुटलेल्या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी इंदापूर तालुक्यातील महायुतीचे नेते मात्र रस्सीखेच करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची धामधूम अजून संपलेली नसतानाच मात्र महायुती मधील धुसफूस आता बाहेर पडू लागले आहे.
इंदापूर तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले विद्यमान आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. यापुढे देखील तालुक्याच्या विकासासाठी एकत्र काम करणार असल्याचे वेळोवेळी भाषणांमधून जाहीर केले होते.
मात्र इंदापूर तालुका दुष्काळाच्या झळा सोसात असतानाच नुकतेच तालुक्यातील 59/57/54 शेतीसाठी 10 ते 12 दिवस पाणी सोडण्याचा निर्णय झाला. निर्णय होतो न होतो तोच महायुतीमधील इंदापूर तालुक्यातील माजी मंत्र्यांनी सोशल मीडियावर अक्षरशः पाणी आमच्यामुळेच मिळाले असे भासवले आहे.
या नेत्यांना तालुक्याच्या विकासासाठी एकत्र यायचं असतं तर त्यांनी त्याविषयी पत्रकार परिषद घेऊन तसेच जाहीर केले असते; मात्र अजून पाणी सुटले नसले तरी इंदापूर तालुक्यातील महायुतीच्या या नेत्यांना श्रेय घेण्याची गडबड झालेली दिसत आहे. एकंदरीतच नागरिकांनी येणारे पाणी हे आमच्या हक्काचे असून कोणाच्या घरचे नसल्याचे किंवा कोणी त्यावर अधिकार गाजविण्याची गरज नसल्याचे सध्या सोशल मीडिया मधून चित्र पहावयास मिळत आहे.
शरद पवार गटही मागे नाही
या लढाईमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी देखील हे पाणी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळेच सुटले असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
युती धर्म नावापुरता
सध्या व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला आहे तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख केल्याने तालुक्यामधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे महायुती केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच का असा सवाल नागरिकांना पडला आहे.





