सय्यदनगर, हांडेवाडी भागात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले

दुषित आणि अपुरे पाणी ; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
हडपसर : सय्यदनगर आणि हांडेवाडी भागातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून, दोन- दोन दिवसांचा गॅप दिला जात आहे. तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील महिलांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक फारुख इनामदार यांनी दिला आहे. हांडेवाडी रोडवरील चिंतामणी नगर येथील गल्ली ४,५,६,७ भागात रात्री साडेबारा ते एक वाजता पाणी येते.
कमी दाबाने आणि अनियमित पाणी मिळत असल्याने आम्हाला पाण्याची वाट पाहत बसावे लागते. हांडेवाडी रोडवर काही भागात कधीकधी तर दोन- दोन दिवस पाणी येतच नाही. तर काही गल्ल्यामध्ये दिवसाआड पाणी येते. मात्र तेही पुरेसे दाबाने येत नाही, असा तक्रारी येथील महिलांनी केल्या आहेत.
सय्यदनगर भागात गल्ली नंबर २२,२८,१९ ,४ या भागात ड्रेनेज युक्त पाणी येते आहे. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना याविषयी वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करत केले असून, पाणी समस्ये बाबत हजारो महिला पाणी पुरवठा विभागावर धडक मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात महिला आहेत.
दरम्यान याबाबत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी गौतम गावंड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी रामटेकडी आणि हांडेवाडी रोडवर दोन ठिकाणी पाण्याची लाईन फुटली होती, मात्र आता त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.
चिंतामणी नगर भागात येणारी पाण्याची लाईन खूपच वळसा घालून येत असल्याने त्याला पुरेशा दाब मिळत नाही. लवकरच सेलेना पार्क येथील पाण्याची टाकी पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.
न्यथा रस्त्यावर उतरणार – फारुख इनामदार
सय्यदनगर आणि हांडेवाडी रोडवरील भागात पिण्याचे पाणी पुरेसा प्रमाणात येत नाही. दिवसाआड आणि रात्री उशिरा पाणी येते. आलेल्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळलेले असते. याबाबत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रशासनाने आठ दिवसांत पाणी प्रश्न सोडविणला नाही, तर रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी नगरसेवक फारुख इनामदार यांनी दिला.




