पाणीबचत आवश्यकच – पालकमंत्री पवार: यंदा अडीच टीएमसी कमी जलसाठा

समान पाणी योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याच्या पालिकेला सूचना
पुणे – खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा 2.5 टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करा. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी. सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे. महानगरपालिकेने पाणी योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी कालवा सल्लागार समिती बैठकीत दिल्या.
शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे उपस्थित होते.
पवार म्हणाले, “खडकवासला धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करा. नवीन मुठा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह अजून एक उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे. भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी पाइपलाइन, पंपिंग स्टेशन आदी कामे गतीने पूर्ण करावीत. यामुळे खडकवासला प्रकल्पावरील ताण कमी होईल. महानगरपालिकेने 100 टक्के पाणी मीटर बसवणे, बेकायदेशीर नळजोड तोडण्यासह त्यावर कठोर कारवाई करणे यावर विशेष भर द्यावा. दक्षिण तसेच पूर्व पुणे भागात तक्रारी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घ्यावीत. कामे गतीने आणि चांगला दर्जा राखून पूर्ण करावीत.’
लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. काही अधिकारी पाणी सोडणाऱ्यांवर दबाव आणून पाणीपुरवठा कमी-अधिक प्रमाणात सोडत आहे. हे दबावतंत्र नक्की टॅंकर लॉबीसाठी, की अन्य कोणासाठी? रविवारी सायंकाळी 4 वाजता आयुक्तांच्या बंगल्यावर जाऊन तेथे किती दाबाने पाणी येते, हे आम्ही पाहणार आहोत. पाणीपुरवठ्याबाबत आम्ही आज मुद्दे मांडले. त्यावेळी केवळ सुधारण करतो, असे उत्तर मिळते. मात्र जीव गेल्यावर सुधारण करणार का? तीन दिवसांत पाणीपुरवठा सुधारला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याचे नेतृत्व मी करेन.
– गिरीश बापट, खासदार
राज्यात विजेची मागणी वाढून ती आता 24 हजार मेगावॅटपर्यंत गेली आहे. भविष्यातही ही मागणी वाढण्याची शक्यता असून, अतिरिक्त वीज उपलब्ध करून घेण्यासाठी “एनटीपीसी’कडून तसेच नॅशनल ग्रीडमधून वीज घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि, भविष्यातही विजेच्या समस्येला गृहीत धरून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री




