जलसंपदा कार्यालय बनले खासगी गोडाऊन

सांगवी, दि. 23 (वार्ताहर) – सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानात असलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयातच साहित्य विक्रेत्यांनी आपले साहित्य ठेवले आहे. त्याला गोडाऊनचे स्वरूप आले आहे. त्याला आधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.
सांगवी परिसरातील पीडब्ल्यूडी अर्थात सार्वजनिक विभागाच्या मैदानात असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे कार्यालय आहे. तेथे सुरक्षारक्षक असणारा कर्मचारी व स्थानिक अधिकारी यांच्या संगनमताने कार्यालयातच खासगी व्यावसायिकांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी परवानगी दिल्याचे दिसून आले. या कार्यालयात रात्री उशिरा साहित्य ठेवले जाते. सकाळी लवकर साहित्य बाहेर काढून घेतले जाते. हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर प्रभातच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. तेथे साहित्याने भरलेली दहा ते बारा पोती व इतर साहित्य ठेवण्यात येत असल्याचे
दिसून आले.
येथे महत्त्वाचे शासकीय व संवेदनशील सामग्री व विभाग असताना स्थानिक अधिकारी याविषयी अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालय सांभाळण्यासाठी असणाऱ्या खासगी कर्मचाऱ्याची परवानगी व येथील दोन अधिकारी यांच्या सांगण्यावरून सदर साहित्य ठेवले जात असल्याचे पोपट बलसाणे या कर्मचाऱ्याने सांगितले.
या ठिकाणी रस्त्यावर व्यवसाय करणारे परराज्यातील लोकांकडून पैसे घेऊन साहित्य ठेवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनाने याठिकाणी अगोदरच रस्त्यावर भाजी व इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांना सदर मोकळ्या जागेत बसू द्यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
एखाद्या शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारचा सामान अथवा बाहेरील वस्तू परवानगी शिवाय ठेवता येत नाही. परंतु, येथे साहित्य ठेवल्याचे दिसून येत आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
येथे असे काही होत आहे, याविषयी मला काही माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो, असे होत नाही असे मला वाटते.
– सतीश सहारे, उपअभियंता, जलसंपदा विभाग, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, सांगवी.
येथे दररोज सायंकाळी उशिरा व्यावसायिक सामान ठेवतात. अनेक लोक या ठिकाणी रात्री आत असल्याचे दिसून येते. तसेच स्थानिक लोक ओट्यावर बसल्यास येथील खासगी कर्मचारी हरकत घेतात. अनेक गैरकारभार याठिकाणी होत असल्याचे दिसून येते.
– सूरज पाटील, स्थानिक रहिवासी.





