Pavana Dam : पवना धरणातून विसर्ग सुरू; धरण ९६ टक्के भरले
Pavana Dam : ४,८२० क्युसेकवरुन ७,५०० क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता

निलेश ठाकर
पवनानगर – पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर पोहचला आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून होणाऱ्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून विद्युतगृहामार्फत धरणातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन दुपारी हा विसर्ग १,४०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. दुपारी ३ वाजता सांडव्याद्वारे अतिरिक्त ३,४२० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.
त्यामुळे विद्युतगृहामार्फत १,४०० क्युसेक आणि सांडव्याद्वारे ३,४२० क्युसेक असा मिळून पवना नदीपात्रातील एकूण विसर्ग ४,८२० क्युसेक झाला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक कायम आहे. पावसाचा जोर आणि धरणातील येवा लक्षात घेता, आवश्यकतेनुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने ७,५०० क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.
सततच्या पावसामुळे ओढे, नाले तसेच पवना नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठील गावांतील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात अथवा नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Pune District : एआयच्या बळावर शेती समृद्धीचा नवा अध्याय : सुनेत्रा पवार





