Water Pollution – परिसरात कालव्याच्या कडेला सर्रास कचरा टाकण्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण झाली आहे. पिंपळगावजोगा डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आल्यानंतर हा साचलेला कचरा थेट प्रवाहाबरोबर वाहून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिकांकडून कालव्यालगत प्लॅस्टिक, घरगुती कचरा आणि विविध प्रकारचा घनकचरा टाकला जात असल्याने पाण्याचे प्रदूषण वाढले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आवर्तन सुरू झाल्यानंतर हा कचरा मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. हेच दूषित पाणी शेतीसाठी आणि इतर वापरासाठी जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कालव्यालगत पसरलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. जलचरांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह कालव्याच्या पाण्याबरोबर वाहून जाणारा कचरा घातक ठरत आहे. विशेषतः प्लॅस्टिक आणि रासायनिक कचऱ्यामुळे मासे व इतर जलजीवांचे जीवन धोक्यात आले आहे. हा कचरा जलप्रवाहात अडथळा निर्माण करत असून, त्यामुळे जलपरिसंस्थेचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य कचरा व्यवस्थापन प्रणाली राबवणे गरजेचे आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका कालव्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळी वातावरणात किंवा पाण्याच्या संपर्कामुळे हा कचरा अधिक कुजतो, ज्यातून पसरणारी दुर्गंधी नागरिकांच्या त्रासात भर घालत आहे. कालवा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तज्ज्ञांच्या मते कालव्यात टाकला जाणारा प्लॅस्टिक व घनकचरा हा जलचर प्राण्यांसाठी मृत्यूचे जाळे ठरत आहे. पाण्याबरोबर वाहून जाणारा कचरा माशांच्या श्वसनावर परिणाम करतो, तसेच अनेक जलजीव हा कचरा अन्न समजून गिळतात आणि त्यांचा मृत्यू होतो. ही परिस्थिती केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर मानवी आरोग्यासाठीही धोकादायक आहे, असे मत जलचर प्राणी मित्र ऋतिक डोमसे यांनी व्यक्त केले आहे.