ताजमहालच्या मुख्य घुमटातून पाणीगळती; मुसळधार पावसाचा बसला फटका

आग्रा – दिल्लीसह अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच मागील तीन दिवसांपासून आग्रामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
या पावसामुळे जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालला देखील याचा फटका बसला आहे. कोसळणाऱ्या पावसामुळे ताजमहाल परिसरामध्ये प्रचंड पाणी साचले आहे. त्यामध्ये ताजमहालमधील तीन घुमटांपैकी मुख्य घुमटामधून पाणी गळत आहे. ही माहिती भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर देखील याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
दोन दिवसांपासून सोशल मीडियावर दिल्लीमधील पावसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसेच पावसामुळे ताजमहालमध्ये सुरु असणाऱ्या पाणी गळतीचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. त्यामध्ये ताजमहालसमोरील उद्यानामध्ये पाणी साचल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच आग्रा विभागाच्या पुरातत्व खात्यामधील अधीक्षक प्रमुख राजकुमार पाटील यांनी माध्यामांना माहिती दिली. ते म्हणाले ‘ताजमहालमध्ये पाण्याची गळती होत असल्याची बातमी खरी आहे. आम्ही मुख्य घुमटाची तपासणी केली असून पावसामुळे ही गळती होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्याने देखील आम्ही घुमटाची तपासणी केली आहे.
आग्रामध्ये गुरुवारी 151 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 80 वर्षात 24 तासांतील सर्वाधिक पाऊस हा पडला आहे. त्यामुळे आग्रा प्रशासनाने सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
तसेच आग्रामधील इतर ऐतिहासिक स्थळे म्हणजे आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्री, झुनझुन का कटोरा, रामबाग, मेहताब बाग, चिनी का रौझा, सिकंदरा येथील अकबराची कबर आणि रोमन कॅथलिक दफनभूमी यांनाही मुसळधार पावसामुळे किरकोळ नुकसान झाले आहे.





