शहरातील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य; जीबीएसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते सर्वेक्षण

Pune | जानेवारी महिन्यात पुणे शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराचा उद्रेक झाला होता. शहरातील सिंहगड रस्त्या परिसरातील नागरिकांना जीबीएसची लागण झाली होती. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली. या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर सरकारने याची गांभीर्याने दखल घेत केंद्रातून काही अधिकाऱ्यांचे पथक या भागात पाठवले होते. या पथकांने येथील विहिरीत असणाऱ्या दूषित पाण्याचे नमुने घेत ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. या आजाराचे काही रुग्ण हे सांगली, कोल्हापूर, नागपूर येथे देखील आढळून आले होते.
जीबीएसमुळे दूषित पाण्याचा प्रश्न उभा राहिला. याचे कारण म्हणजे दूषित पाण्यामुळे या आजाराची लागण झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. अनेक रुग्णांना जीबीएसची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काहींचा या आजारामुळे मृत्यू देखील झाला होता. जीबीएसीचा उद्रेक ज्या भागात झाला होता, त्या भागातील पाण्याचे नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून या तपासणीत काही ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाण्याचे ३१२ नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील ७९ ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह खडकवासला परिसरातील पाण्याच्या नमुन्यांचा समावेश आहे.
या ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
खडकवासला धरणातील प्रक्रिया न केलेले पाणी
खडकवासला परिसरातील काही विहिरीचे पाणी
धायरी परिसरातील काही कूपनलिकांचे पाणी
तळवडे, ताथवडे, दिघी परिसरातील काही कूपनलिकांचे पाणी
काळेवाडी, वाकड, मोशी, थेरगावमधील घरगुती नळांचे पाणी
धायरी परिसरातील काही घरगुती नळांचे पाणी
संत तुकारामनगर, घायरी परिसरातील आरओ प्रकल्पांतील पाणी
आनंदनगर, माणिकबाग, वडगाव बुद्रकमधील जारचे पाणी
नन्हे गावातील घरगुती नळांचे पाणी
अनेक नमुन्यांत ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळून आले आहेत. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य ठरले आहे.





