“जायकवाडी’त नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी; गुरुवारपासून होणार विसर्ग

छत्रपती संभाजीनगर – पंधरा दिवस चर्चा, वाटाघाटींनंतर अखेर नगर – नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे 8.60 टीएमसी (दशलक्ष घनफूट) पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचा निर्णय सोमवारी (30 ऑक्टोबर) झाला. गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी हे आदेश जारी केले.
गुरुवारी (2 नोव्हेंबर) पाणी सोडले जाईल. नगर – नाशिक ते जायकवाडी प्रवासात अडीच टीएमसी पाण्याची गळती होईल. त्यामुळे 5.80 टीएमसीच पाणी जायकवाडीत येणार आहे. दरम्यान, जायकवाडीतून माजलगाव प्रकल्पासाठी एक ते दीड टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. रब्बीच्या आवर्तनात ही कार्यवाही केली जाईल.
मोदींचा शिर्डी दौरा आणि इतर कारणांनी आदेश लांबले होते. कार्यकारी संचालकांच्या आदेशानुसार मुळा आणि प्रवरा समूहातून 30 टक्के तर दारणा, गंगापूर समूहातून पाणी सोडताना 35 टक्के पाण्याची वाटेत गळती होईल, असे गृहीत धरले आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या तिसऱ्या सूत्रानुसार पाणी सोडण्याचा निर्णय झाला.
यात नगर – नाशिकच्या धरणांतून खरिपात 589 दलघमी म्हणजे 20.79 टीएमसी तर जायकवाडीतून 219 दलघमी म्हणजे 7.73 टीएमसी वापर झाल्याचे समोर आले. आदेशाची अंमलबजावणी 31 ऑक्टोबरपूर्वी करावी.
एखाद्या धरणसमूहातून पाणी सोडण्यास तांत्रिक अपरिहार्य कारणामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याची कार्यवाही पूर्ण करणे शक्य झाले नाही, तर निर्धारित जलसाठा सोडण्यापर्यंत ही कार्यवाही सुरू ठेवावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. असे मुळाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.
गुरुवारी कशामुळे?
पोलिस बंदोबस्त, 24 बंधाऱ्यांतील फाळ्या काढणे, नदीपात्रातील मोटारींचा वीजपुरवठा बंद करणे, यासाठी दोन दिवस लागतील. त्यामुळे गुरुवारी पाणी सोडण्यात येईल. मात्र, पोलिस बंदोबस्त किंवा इतर कारणांवरून वेळापत्रकात चालढकल करू नये, असे आमदार प्रशांत बंब म्हणाले.
जायकवाडीसाठी केवळ 6 टीएमसी पाणी कमी होते, पण अडीच टीएमसी पात्रात गळती होईल, याचा विचार करून 8.603 टीएमसी सोडण्याचा निर्णय घेतला. ऊर्ध्व धरणे 100 टक्के भरली असली तरी लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे पाणी सोडण्याच्या निर्णयाने नगर, नाशिकला टंचाईला सामोरे जावे लागेल.
-उत्तम निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता.





