Satara Water Scarcity पाणीबाणी! साताऱ्यातील ‘या’ ७ तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष; ४३ विहिरी आणि २४ बोअरवेल अधिग्रहित
Satara Water Scarcity : माण तालुक्यात टंचाईची भीषणता अधिक, एकट्या तालुक्यात ४६ टँकर सुरू; ६१ हजारांहून अधिक लोकसंख्या आणि पशुधन पाण्याच्या प्रतीक्षेत.

Satara Water Scarcity – जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत माण, खटाव, वाई, पाटण, कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील १०५ गावे व ३४२ वाड्यांना ९७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने विहिरींची पाणी पातळी खालावत आहे.
पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने पिकांचेही नुकसान होत आहे. करचा प्रस्ताव दाखल होताच पाहणी करुन तात्काळ टँकर सुरु करण्याबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या काही भागात उन्हाळी पाऊस झाला असला तरी भूजल पातळी अद्याप खालावलेली असल्याने टंचाई भेडसावत आहे. माण तालुक्यात ४४ गावे व २६९ वाड्यांमध्ये टंचाई जाणवू लागल्याने शासकीय ३ व खासगी ४३ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.
या पाण्यावर ६१ हजार २४६ लाेकसंख्या व ६ हजार ४८८ पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात ६ गावे, ८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ५ हजार ३९० लाेकसंख्या व ८ हजार ३०६ पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यात १ गाव व ८ वाड्यांना टँकरने पाणी पुरवले जात असून २ हजार ३८९ लाेकसंख्या व १ हजार ४८० पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे.
खटाव तालुक्यात ३० गावे व ५८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत असून ३२ हजार ८५९ लाेकसंख्या व ५ हजार १५३ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. खंडाळा तालुक्यात एका गावात टँकरने पाणीपुरवठा होत असून ५०६ लाेकसंख्या व १८८ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्यात २२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून २८ हजार १४१ लाेकसंख्या व १६ हजार ४८८ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे.
महाबळेश्वर तालुक्यात एका गावात टॅंकरने पाणी पुरवठा होत असून १५३ लाेकसंख्या या पाण्यावर अवलंबून आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ४३ विहिरी व २४ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.






