Baramati : वाया जाणारे पाणी पुन्हा तलावात जमा
Baramati : सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तावरे आणि सभापती जयश्री तावरे यांनी आपल्या तांत्रिक बुद्धिमत्तेचा वापर करून एक उत्तम मार्ग शोधला. गळती होत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी चर खोदून, ते पाणी सध्या बंद असलेल्या जुन्या पाणीपुरवठा विहिरीत सोडण्यात आले.

माळेगाव : माळेगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती जयश्री तावरे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अवघ्या दहा महिन्यांत दाखवून दिलेली कार्यतत्परता आणि घेतलेला कल्पक निर्णय आज माळेगावच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद ठरला आहे. त्यांनी केलेल्या तांत्रिक व अचूक नियोजनामुळे आज वाया जाणारे पाणी पुन्हा पुनर्वापरात आल्याने माळेगाववासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भविष्याचा अचूक वेध घेऊन सन २००८-०९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून माळेगाव खुर्द लगत पाणीपुरवठा साठवण तलावाची उभारणी केली होती. परंतु, काळानुरूप या साठवण तलावातून लाखो लिटर पाणी गळती होऊन वाया जात होते, ज्यामुळे नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यात मोठे अडथळे निर्माण होत होते. या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्ष सुयोग सातपुते, गटनेते जयदीप तावरे, मुख्याधिकारी बालाजी लोंढे आणि पाणीपुरवठा सभापती जयश्री तावरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हा प्रश्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी केली.
सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तावरे आणि सभापती जयश्री तावरे यांनी आपल्या तांत्रिक बुद्धिमत्तेचा वापर करून एक उत्तम मार्ग शोधला. गळती होत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी चर खोदून, ते पाणी सध्या बंद असलेल्या जुन्या पाणीपुरवठा विहिरीत सोडण्यात आले. त्यानंतर साडेसात एचपीच्या शक्तिशाली विद्युत मोटारींच्या साहाय्याने ती भरलेली विहीर थेट साठवण तलावाशी जोडत वाया जाणारे लाखो लिटर पाणी पुन्हा तलावात साठवण्यात आले. या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब पुनर्वापरात आला असून, पूर्वी जे पाणी फक्त ४५ ते ५५ दिवस पुरायचे, ते आता आणखी १० ते १५ दिवस अधिक म्हणजेच अधिक काळ पुरेल असा ठाम विश्वास सभापती जयश्री तावरे यांनी व्यक्त केला आहे.
विविध भागांत सुरळीत पाणीपुरवठा
केवळ तलावाच्या गळतीवर नियंत्रण मिळवून न थांबता, सभापती जयश्री तावरे यांनी अजिंक्यनगर, संभाजीनगर, वाघमोडे वस्ती, कोळेकर वस्ती, नाळे वस्ती, दयानगर व आदर्शनगर यांसारख्या विविध भागांत पाण्याचा सुरळीत आणि विनाअडथळा पुरवठा सुरू केला आहे. त्यांच्या या अथक परिश्रमांमुळे जनतेला प्रत्यक्षात दिलासा मिळाल्याची भावना माळेगाववासीयांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.





