MIDC Area : औद्योगिक परिसरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर; कचरा गाड्यांची कमतरता
MIDC Area : अनधिकृत वसुलीच्या तक्रारी, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला असून, अनियमित कचरा संकलन, कचरा उचलण्यासाठी पैशांची मागणी आणि घातक औद्योगिक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबतच्या तक्रारींमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत.
काही कंपन्यांमध्ये महिना – महिनाभर कचरा संकलनासाठी गाडी येत नसल्याच्या तक्रारी असून, यामुळे परिसरातील स्वच्छता, कामगारांचे आरोग्य आणि औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
औद्योगिक परिसरातील कंपन्यांमधून निर्माण होणारा कचरा नियमितपणे उचलण्यासाठी पुरेशा गाड्या उपलब्ध नसल्याची उद्योजकांची तक्रार आहे. मध्यंतरी कचरा गाड्यांची संख्या वाढविण्यात आली होती, मात्र पुन्हा गाड्यांची कमतरता जाणवू लागली आहे.
मोशी कचरा डेपोतील अपघातानंतर संपूर्ण शहराच्या कचरा व्यवस्थापनावर परिणाम झाला आहे, त्यापाठोपाठ एमआयडीसी मध्येही ही कचर्याच्या समस्या आता वाढताना दिसत आहेत. काही ठिकाणी कचरा संकलनाची नियमित वेळ निश्चित नसल्याने कंपन्यांना कचरा साठवून ठेवावा लागत आहे.
तसेच, कचरा गाड्यांवर सायरन अथवा ध्वनिसूचक यंत्रणा नसल्याने गाडी आल्याची माहिती वेळेवर मिळत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
कचरा उचलण्यासाठी खासगी व्यक्तींकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारीही आता वाढत असल्याचे दिसून येत आहेत, काही कंपन्या आणि व्यावसायिकांना कचरा उचलण्यासाठी दरमहा सुमारे दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे, काही ठिकाणी मासिक पॅकेजच्या स्वरूपात पैसे घेतले जात असल्याच्याही तक्रारी आहेत.
मात्र, या वसुलीचे स्वरूप, संबंधित व्यक्ती आणि त्यामागील अधिकृत व्यवस्था यांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर महानगरपालिकेचे नाव, वाहन क्रमांक आणि कंत्राटदाराची माहिती स्पष्टपणे नमूद नसल्याने अधिकृत व अनधिकृत सेवांमधील फरक ओळखण्यातही अडचणी येत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न
औद्योगिक कचऱ्यामध्ये धातूचे तुकडे, प्लास्टिक, पॅकिंग साहित्य यांसारख्या बिगरघातक कचऱ्याबरोबरच रसायनांनी दूषित गाळ, वापरलेली रसायने आणि कॉटनचे वापरलेले कापड इतर घातक अवशेषांचाही समावेश असतो, या दोन्ही प्रकारच्या कचऱ्यांचे संकलन आणि विल्हेवाट एकाच पद्धतीने करता येत नाही.
रांजणगाव येथे घातक औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया आणि सुरक्षित विल्हेवाटीसाठी सुविधा उपलब्ध असली अणि उरलेल्या कचरा हा पालिकेकडून उचलला जात असला तरी, दररोज ज्या प्रमाणात कचरा संकलण झाला पाहिजे ते होत नसल्याने अस्वच्छता अणि आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत.
काही ठिकाणी कचरा वेचक आणि भंगार व्यावसायिकांकडून कंपन्यांनी बाहेर ठेवलेला कचरा चाळला जात असल्याने तो परिसरात पसरतो, अशी तक्रार आहे. परिणामी, रस्ते आणि सार्वजनिक जागांवर अस्वच्छता वाढत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अनियमित संकलनामुळे कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आव्हान निर्माण होत आहे.
ज्वलनशील किंवा रसायनांनी दूषित कचऱ्याची अयोग्य साठवणूक झाल्यास आगीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण, अग्निसुरक्षा आणि कामगारांच्या आरोग्याशीही संबंधित आहे.
‘एमआयडीसी परिसरातील कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. औद्योगिक भागनिहाय कचरा संकलनाचे निश्चित वेळापत्रक असावे, पुरेशा कचरा गाड्या उपलब्ध असाव्यात आणि प्रत्येक गाडीवर महानगरपालिकेची अधिकृत ओळख स्पष्टपणे दिसावी, अशी आमची मागणी आहे.
कचरा उचलण्यासाठी अनधिकृतपणे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणेही तेवढेच आवश्यक आहे. त्याचबरोबर, घातक औद्योगिक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट, नियमित स्वच्छता आणि प्रभावी देखरेख यंत्रणा निर्माण केली पाहिजे.
औद्योगिक परिसरातील कचरा व्यवस्थापन हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून कामगारांचे आरोग्य, पर्यावरण आणि अग्निसुरक्षेशी संबंधित विषय आहे, त्यामुळे महानगरपालिकेने संबंधित विभागांच्या समन्वयातून ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. उद्योजकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही आणि कामगारांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी’ – अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन.





