कचरा संकलनाचे नियोजनही ढासाळले; दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा सोबत, दिवसाआड कचरा संकलन ठप्प
शहरात ठिकठिकाणी कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आली

चिखली – एकीकडे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच आता कचरा संकलन आणि रस्ते साफसफाईच्या कामांचाही बोजवारा उडाल्याचे चित्र काही भागांत दिसून येत आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर असताना अनेक भागांत कचरा संकलन विस्कळीत झाल्याच्या तक्रारी आहेत.
कचरा संकलनाच्या गाड्या फिरत असल्याच्या दिसत असल्या, तरी संकलित कचरा नियोजित केंद्रांवर उतरवला जात नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत असल्याने स्मार्ट सिटीच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील काही भागांत कचरा संकलनासाठी येणाऱ्या गाड्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मात्र, संकलित कचरा संकलन केंद्रांवर खाली केला जात नसल्याच्या तक्रारींमुळे कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, काही भागांत कचरा साचून राहत असून नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
चिखली प्रभाग क्रमांक ११ मध्येही साफसफाईचा फज्जा
दिवाळीपूर्वी घरांची स्वच्छता, बाजारपेठांतील वाढती वर्दळ आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई यांना विशेष महत्त्व असते. अशा वेळी कचरा संकलनाची यंत्रणाच विस्कळीत होत असेल, तर नागरिकांनी स्वच्छ शहराची अपेक्षा तरी कोणाकडून करायची, असा सवाल उपस्थित होत आहे.
कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच कामात हलगर्जीपणा होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. पूर्णानगर – कृष्णानगर – घरकुल प्रकल्प – अजंठानगर येथील प्रभाग क्रमांक ११ मध्येही रस्ते साफसफाईबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत सोसायट्यांमधील रस्त्यांची दररोज साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
काही लहान मोठ्या सोसायटी भागात दोन ते तीन दिवसांतून एकदाच साफसफाई केली जात असल्याने रस्त्यांवर धूळ, कचरा आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ठेकेदारांना अभय, नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास?
स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करायचा, ठेकेदारांना कामे द्यायची आणि त्यानंतरही नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागायचा, हा प्रकार गंभीर आहे. ठेकेदारांना नियमित साफसफाईचे निर्देश केवळ कागदावरच दिले जातात का? कामाची प्रत्यक्ष तपासणी होते का? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली जाते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
कचरा संकलनाच्या गाड्यांचे नियोजन, कचरा खाली करण्याची व्यवस्था आणि प्रभागनिहाय रस्ते साफसफाई यांचे नियमित निरीक्षण झाले पाहिजे. स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना नागरिकांना मूलभूत स्वच्छतेसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर हा केवळ प्रशासकीय ढिसाळपणाचा प्रश्न राहत नाही; तो सार्वजनिक निधीच्या वापराबाबत उत्तरदायित्वाचा प्रश्न बनतो.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने कचरा संकलन सुरळीत करावे, प्रभाग क्रमांक ११ सह तक्रारग्रस्त भागांत नियमित साफसफाई सुनिश्चित करावी आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करावी, नागरिकांकडून अशी मागणी होत आहे.
CA Exams: सीए परीक्षेत वेहेरगावच्या लेकींचे यश; वीरा बोत्रे, पायल देशमुखने ठेवला आदर्श





