Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार अडचणीत? 100 कोटींचा मानहानी दावा; नेमकं प्रकरण काय
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजप नेते भरत पाटील राजे यांनी १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Vijay Wadettiwar : वाशिम जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तब्बल 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला असून, वाशिम जिल्हा न्यायालयाने हा दावा स्वीकारला आहे.
हा दावा भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख भरत राजे उर्फ राजू पाटील राजे यांनी दाखल केला आहे. वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
नेमकं प्रकरण काय?
भरत पाटील राजे यांच्या मते, 28 डिसेंबर 2025 रोजी विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक माध्यमांसमोर त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वाशिममधील कथित बनावट नोटा प्रकरणात गुन्हा दाखल असूनही अटक झालेली नाही, तसेच शासन आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता.
मात्र, हे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा दावा करत पाटील राजे यांनी त्याला जोरदार विरोध केला आहे.
या प्रकरणी 3 जानेवारी 2026 रोजी वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यास आणि सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, निर्धारित मुदतीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर न्यायालयीन मार्ग स्वीकारण्यात आला.
18 मार्च 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात आला. न्यायालयाने हा दावा स्वीकारला असून, या प्रकरणाचा दावा क्रमांक 13/2026 असा आहे.
राजकारण तापलं
भरत पाटील राजे यांनी स्पष्ट केले की, “माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, अन्यथा जनतेची माफी मागावी.”
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, विजय वडेट्टीवार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पुढील सुनावणी आणि वडेट्टीवार यांची भूमिका याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





