“मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राजीनामा देणार होतो”; गोगावलेंच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांचा खुलासा

Bharatshet Gogawale And Sanjay Shirsat | आमदार संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्ष केल्याने महाडचे आमदार भरत गोगवले नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत त्यांनी अंबरनाथमधील एका कार्यक्रमात भाष्य केले होते. यानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी समोर आली होती. यावर आता आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राजीनामा देणार होतो, असा खुलासा देखील संजय शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट काय म्हणाले ?
“सिडकोचे अध्यक्षपद भरत गोगावले यांनी मागितलं नव्हतं, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देखील मागितलं नव्हतं. मी देखील सिडकोचं अध्यक्षपद मागितलं नव्हतं, हे सत्य आहे. भरत गोगावले आणि मी काय आणखी इतर जण मंत्रिपदाच्या शर्यतीत होतो. राजकीय गणितांमुळं मंत्रिमंडळ विस्तार आता होणार, निवडणुकीनंतर होणार, अधिवेशनानंतर होणार याच्या बातम्या पाहिल्या आहेत. त्यामुळं आम्हाला त्रास होतो हे निश्चित आहे. परंतु, भरत गोगावले नाराज आहे किंवा मी नाराज आहे असं नाही आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे,” असं शिरसाट म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “पहिल्या दिवशी दोन मंत्री झाले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला होता त्या विस्तारानंतर मी राजीनामा देणार होतो, का, कशासाठी, काय घडलं यात आता जाण्यात अर्थ नाही,” असं संजय शिरसाट यांनी सांगितले. तसेच भरत गोगावले मनमोकळ्या स्वभावाचा माणूस आहे. त्यामुळं बोलून जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भरत गोगावले काय म्हणाले होते?
“मंत्रिपदं मिळाल्यानंतर साहेबांनी आम्हाला विचारलं, शेठ काय करायचं? एक जण बोलला, मी राजीनामा देतो. तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली, तर मी राजीनामा देतो. त्याला समजवला. म्हणून साहेबांनी कदाचित त्याला सिडकोचं अध्यक्षपद दिले असेल,” असं भरत गोगावले संजय शिरसाट यांच्याविषयी अप्रत्यक्षपणे म्हणाले होते.





