Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राला पाकिस्तानात मिळत होती VIP सुरक्षा? धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Jyoti Malhotra – पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योतीला पाकिस्तानमध्ये व्हीव्हीआयपी सुरक्षा मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका स्कॉटिश व्लॉगरने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ज्योती पाकिस्तानच्या प्रसिद्ध अनारकली बाजारात फिरताना दिसत आहे. ज्योतीच्या सुरक्षेसाठी अनेक रक्षकही तैनात करण्यात आले होते.
स्कॉटिश युट्यूबर कॅलम अॅब्रॉड पाकिस्तानला भेट देण्यासाठी गेले होते. त्याच वेळी ज्योती देखील पाकिस्तानात होती. ज्योती आणि कॅलम त्याच वेळी लाहोरच्या अनारकली बाजारात फिरण्यासाठी बाहेर पडले होते आणि दोघांचा संवादही झाला. कॅलमने युट्यूबवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ज्योती अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढलेली दिसते.
नऊ दिवसांच्या पोलिस कोठडी संपल्यानंतर सोमवारी ज्योतीला हरियाणाच्या हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी ज्योती मल्होत्राला आधीच दोनदा रिमांडवर घेतले आहे आणि तिसऱ्यांदा तिला न्यायालयात हजर केले गेले. हेरगिरीच्या संशयावरून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या १२ जणांमध्ये तिचा समावेश होता.
ती एक यूट्यूब चॅनल चालवत होती आणि तिच्याविरुद्ध अधिकृत गुप्तता कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केल्यानंतर १६ मे रोजी तिला अटक करण्यात आली. नोव्हेंबर २०२३ पासून ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. हेरगिरीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली भारताने १३ मे रोजी दानिशला हद्दपार केले.





