काॅंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप; आजच्या टॉप 10 बातम्या वाचा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचे निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत.
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा मान –
प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. तर उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालाय. 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
अवकाळी पावसाचा इशारा –
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह परिसरातील कमाल तापमानात पाच अंशाने वाढ झाली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
भारत जोडो यात्रेचा समारोप –
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. श्रीनगरमधल्या शेर-ए-काश्मिर स्टेडिअमवर भव्य सभा घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेचा समारोप झाल्याची घोषणा केली. या यात्रेची तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरुवात झाली होती. ही यात्रा 145 दिवस, 12 राज्यांमधून निघाली. या यात्रेने तब्बल 4080 किमीचा पायी प्रवास केला. त्यानंतर जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे या यात्रेचा समारोप झाला.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून –
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्यापासून प्रारंभ होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील तो अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प ठरणार आहे.
बीबीसीच्या वादग्रस्त लघुपटाविषयी 6 फेब्रुवारीला सुनावणी –
गुजरात दंगलीवरील बीबीसी निर्मित लघुपटावर बंदी घालण्यावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. कोर्टात या प्रकरणी 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते एमएल शर्मा यांनी सोमवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती.
बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी –
आपल्या गांधीनगर येथील आश्रमातील शिष्येवर बलात्कार केल्याच्या आरोपात येथील न्यायालयाने अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला दोषी ठरवले आहे. आता दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर उद्या म्हणजे मंगळवारी त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे. आसारामचा मुलगा नारायण साई, पत्नी, चार अन्य शिष्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. मात्र सुनावणीच्या वेळी या प्रकरणाशी सर्व तथ्ये तपासून पाहिल्यानंतर आसाराम वगळता अन्य आरोपींना दोषमुक्त करण्यात आले आहे.
आत्मघातकी बॉम्बस्फोटात 46 ठार –
पाकिस्तानातील पेशावर शहरामध्ये तालिबान्यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान 46 जण ठार झाले आहेत. तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. आज दुपारी पेशावरमधील मशिदीमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला. यावेळी मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्यांची मोठी गर्दी होती. स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये नागरिक, पोलीस, सुरक्षा रक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
होतोय राडा दमदार.. येतोय भावी आमदार ! –
जग्गू आणि जुलिएट या बहुचर्चित सिनेमातील ‘भावी आमदार’ हे गाणं उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय अतुलचं धमाकेदार म्युजिक या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये आणि अमेय वाघचा भन्नाट डान्स पाहायला मिळणार आहे. ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ निर्मित अमेय वाघ-वैदेही यांची सुपरक्यूट जोडी असलेला ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हॉकी प्रशिक्षक रीड यांचा राजीनामा –
भारताच्या हॉकी संघाला नुकत्याच ओडीशात पार पडलेल्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत अपयश आले. संघाच्या या सुमार कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय संघाचे प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर त्यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघाने गेल्या चार वर्षांत चमकदार कामगिरी केली होती मात्र, केवळ विश्वकरंडकात अपयश आल्याने निराश होत रीड यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.





