Maharashtra Scheme : सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या योजना बंद करण्याचा घाट घातला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील आणखी एक निर्णय रद्द करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती. मंत्रालयाजवळ जीवन बिमा मार्ग येथे ९०९ चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. या जागेसंदर्भात २०० चौरस फूट जनता दल सेक्युलर आणि ७०० चौरस फूट प्रहार जनशक्ती कार्यालयाला देण्यात आली होती. आता या निर्णयात फडणवीस सरकारकडून बदल करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून या निर्णयात बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे प्रहारचे बच्चू कडू यांना देखील मोठा झटका बसला आहे. या निर्णयावर बच्चू कडू काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतील अनेक आमदारांना आपल्या सोबत घेतले. यासाठी प्रहारचे बच्चू कडू यांची देखील साथ शिंदेंना लाभली होती. आता सध्याच्या घडीला महायुतीत दिसताना सारे आलबेल वाटत असले तरी अंतर्गत राजकारण सुरू असल्याची चर्चा होत आहे. यामुळे आता महायुतीतील अंतर्गत वाद होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्पकडून मोदी अन् भारताचे भरभरून कौतुक ; म्हणाले,”मोदी माझे चांगले मित्र”, पाकिस्तानी पंतप्रधानांचे पडले तोंड