Pune District : विरोधकांच्या पराभवासाठी प्रभाग फोडले; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा शेडगे यांचे टीकास्त्र

बारामती : विरोधी उमेदवारांचा पराभव व्हावा, या उद्देशाने प्रभागातील मतदार फोडण्याचे काम केले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा आरती शेडगे यांनी केला. बारामती नगरपरिषद प्रशासनाने दखल घेत चतुः सिमांप्रमाणे त्या त्या प्रभागातील मतदारांना बाहेरील प्रभागाशी जोडू नये, असे आवाहन शेडगे यांनी केले. बारामतीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. शेडगे म्हणाल्या, प्रभाग क्रमांक तेराचा जो नकाशा (दि.३०) प्रसिद्ध केला. तेव्हा त्याची लोकसंख्या ५०५२ इतकी होती. मात्र, ८ ऑक्टोबरला प्रभागाच्या ज्या मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या, त्यावेळेस प्रभागाची लोकसंख्या २१९३ इतकी दाखविलेली असून उर्वरित २८५९ मतदार हे प्रभाग बारा, तेरा व चौदा अशा तीन प्रभागात समाविष्ट केलेले आहेत.
प्रभाग बारा व चौदा यांच्याशी या मतदारांचा काहीही संबंध नसतानाही नियोजित पद्धतीने हे काम केल्याचा दावा आरती शेंडगे यांनी केला आहे. प्रभाग चौदाचेही पूर्वीचे मतदान ५२१९ इतके होते, प्रत्यक्ष मतदारयादी प्रसिद्ध झाल्यावर हीच संख्या ५५३० इतकी झाली आहे. प्रभाग बारामध्ये ४८६७ मतदार होते, मतदारयादी प्रसिद्ध झाल्यावर ७११२ मतदार या प्रभागात समाविष्ट दिसत आहेत. प्रभाग पंधरामध्येही असेच झालेले आहे. तेरा क्रमांकाच्या प्रभागातही इतर प्रभागातील मतदार जोडण्याचे काम केलेले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी बारामती नगरपरिषदेच्या निवडणूका लढविणार असल्याचेही यावेळी आरती शेंडगे यांनी जाहीर केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, तालुका महिलाध्यक्षा वनिता बनकर, युक्काध्यक्ष बळीराज बेलदार पाटील उपस्थित होते.
चतुः सिमातील मतदार त्या प्रभागात घ्या
एकमेव तेरा प्रभाग असा आहे की केवळ चारशे मतदान त्या प्रभागातील आहे, इतर सर्व मतदार इतर प्रभागातील जोडले आहेत. शहरातील तावरे बंगला या एकाच वसाहतीतील मतदार प्रभाग बारा, तेरा व चौदा अशा तीन प्रभागांत समाविष्ट करण्याचे काम केले आहे. चंद्रमणीनगरचे फक्त चारशे मतदान आहे. उर्वरित मतदार इतर प्रभागाला जोडलेले आहेत. दरम्यान, याविषयी हरकती नोंदविल्याचेही त्यांनी सांगितले.नगरपरिषदेने निश्चित केलेल्या चतुः सिमामधील मतदार त्या प्रभागात घ्यावी इतकीच आमची मागणी आहे. पण नकाशाबाहेरील मतदार विविध प्रभागांना जोडण्याचे काम नगरपरिषदेने केल्याचा आरोप त्यांनी केला.





